मनोगत

नमस्कार मंडळी.

"लेखणीतली शाई" या ब्लॉगवर आपलं स्वागत. तुम्हाला माझं लेखन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपल्या टाळ्यांचे व टीकांचे मनापासून स्वागत.

आपला,
(ब्लॉगलेखक) प्रशांत

Thursday, September 30, 2010

तुझ्या-माझ्यात

शांतता हवेत
शांतता नभात
अशा रम्य वेळी
आणि तुझी साथ

आकाश निरभ्र
रात्र चांदण्याची
अन् तुझा चेहरा
आभा चंद्रमाची

एक हास्य तुझे
गालावर खळी
मिटता पापणी
गुलाब-पाकळी

मंद वाहे वारा
हवेत गारवा
आणि तुझा स्पर्श
सुगंधी मरवा

तू माझ्या मनात
मी तुझ्या मनात
आणि तुझे माझे
हातांमध्ये हात

Monday, August 30, 2010

पाऊस-कविता

"पाऊस" या विषयावर अनेक कवींनी अनेक कविता केल्या असल्या, तरी पाऊस जसा हवाहवासा वाटतो तशा कविताही हव्या हव्याशा वाटतात. दोन-तीन वेळा पावसावर एक-दोन ओळी सुचल्या, पण सलग कविता काही सुचली नाही. :( मग विचार केला, की मराठी ब्लॉगबांधवांची मदत घ्यायला काय हरकत आहे? या पूर्वी "जे जे उत्तम", "आवडलेले थोडे काही", "साखळी हायकू" किंवा अगदी अलिकडच्या "मावसबोलीतल्या कविता" अशा अनेक उपक्रम मराठी ब्लॉगजगतात छानच प्रतिसाद मिळाला. त्यातून असा विचार आला, की पावसावरील कडव्यांची साखळी का करू नये?

तेव्हा, ब्लॉगबंधु-भगिनींनो, "पाऊस-कविता" पुढे चालवण्यासाठी काही सोपे नियम -

१. शक्यतो छंदबद्ध कडवे तयार करू. अगदीच नाही जमलं तर मुक्तछंद चालेल. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? कविता गुंफ़ायची असल्यामुळे आधीचा कडव्याशी थोडासा तरी संबंध असावा.

२. छंदाचं नाव माहिती असल्यास ते कळवावे. त्याबद्दल माहिती दिली तर छानच. अर्थात नाही दिली तरी चालेल.

३. किमान एक व जास्तीत जास्त चार ब्लॉगबांधवांना खो देता येईल. संबंधित ब्लॉगलेखकास प्रतिसाद देऊन तसे कळवावे.

४. खो मिळाल्यावर ज्याच्या/जिच्याकडून खो मिळाला आहे त्या ब्लॉगलेखकाच्या पोस्टाचा दुवा आपल्या पोस्टात द्यावा व शक्य असल्यास आधीची कडवीही उतरवावीत. तसेच आपण खो स्वीकारल्यावर त्या पोस्टाचा दुवा खो देणाऱ्या पोस्टाच्या प्रतिसादात कळवावा, जेणेकरून आधीच्या लोकांनाही नोंद ठेवता येईल.

५. हे नियम सर्वांच्या सोयीसाठी डकवावे.

६. बस्स. आणखी काही नियम नाही. :-) आता फक्त पाऊस-कविता....

मग करायची‌ सुरुवात?

माझं कडवं - (भुजंगप्रयात छंद)

न क्रोधी असा पावसा रे सख्या रे
तुझी वाट पाहे सखी मी तुझी रे
झणी येउनी वर्ष रे थेंब थेंब
तुझा स्पर्श अंगा करो चिंब चिंब


माझा खो -चक्रपाणि, क्रांती, गायत्री, सेन मन यांना

Saturday, July 31, 2010

शुभं करोति

जाहली सांज
दिवेलागण होई
घराघरांत

नंदादीपाचा
देव्हाऱ्यात पडला
मंद प्रकाश

दारात लक्ष्मी
सोनपावली येते
आशिष देते

देव्हाऱ्यातली
सांजवात म्हणते
शुभं करोति

Wednesday, June 30, 2010

पाच तीन दोन

काल रात्री बऱ्याच दिवसांनी घरी जेवणानंतर पत्ते खेळत बसलो होतो. लहानपणी शाळेला उन्हाळ्याची सुटी लागली की भावंडांमध्ये आणि बालमित्र-मैत्रिणींमध्ये खेळलेले पत्ते शाळा सुटल्यापासून दूर गेले होते ते अनेक वर्षांनी काल आयुष्यात आले. या बावन पत्त्यांमधून किती खेळ निर्माण झाले असतील कोणास ठाऊक! पाच-तीन-दोन, सात-आठ, लॅडिस, तीनशे चार, बदाम सात/सत्ती लावणी, झब्बू, भिकार-सावकार, पेनल्टी, गुलाम चोर, जजमेंट, नॅट-ऍट-होम, रमी, ब्लफ, बिझिक, ब्रिज..... संपणारी यादी आहे. यातले काही खेळ लहानपणी खेळलो होतो तर काहींची नुसती नावं ऐकली होती.

पण पत्त्यांचे घरगुती खेळ म्हटल्यावर माझ्या मेंदूच्या रॅम मेमरीत फ़्लॅश होणारा खेळ म्हणजे पाच-तीन-दोन. दोघंच असले तर रमी, किंवा अगदीच टुकारपणा करायचा असल्यास सात-आठ किंवा भिकार-सावकार, चार भिडू असल्यास लॅडिस, जास्त डोकं चालवायचं असल्यास तीनशे चार, पाच किंवा जास्त मंडळी असल्यास बदाम सात, झब्बू, गुलाम चोर, नॉट-ऍट-होम किंवा जजमेंट, . अनेक खेळ असले, तरी पाच-तीन-दोन ची सर यांपैकी कुठल्याच खेळाला नाही. या खेळाइतकी आयुष्याशी जवळीक साधणारा दुसरा खेळ (पत्त्यांचा) नाही.

पूर्ण जोड वापरता खेळल्या जाणाऱ्या इतर खेळांहून असलेला या खेळाचा वेगळेपणाही अगदी ठळकपणे जाणवणारा आहे. तीन सदस्यांना प्रत्येकी दहा पत्ते यानुसार एकूण तीस पत्ते वापरले जात असल्यामुळे अठ्ठी, नेहली, देहली, गुलाम, राणी, राजा,एक्का यांची चारही रंगांची पानं, तर सत्तीची फक्त बदाम आणि इस्पिकची पानं यात वापरली जातात. तीन भिडूंच्या पत्ते-वाटपात समानता साधतानाच पत्ते निवडीतला हा वर्णभेद मात्र अपरिहार्य आहे! दोन, तीन पाच हात बनवण्याची जबाबदारी असलेले हे तीन भिडू समाजातल्या श्रीमंत, मध्यमवर्गीय गरीब जनतेचे प्रतिनिधित्व करतात.

दोन हात बनवणारा भिडू सर्वात सुखवस्तू - श्रीमंत. पत्ते वाटण्यापलिकडे फारशी कटकट डोक्याला नाही. इतर भिडूंप्रमाणे याला दहा पत्ते मिळत असले, तरी जबाबदारी फक्त दोन हातांची. ती सहज पार पडते. एवढंच नव्हे, तर क्षमता जास्त असल्यामुळे जास्त हातही साधतात. हे 'अतिरिक्त' हात अर्थातच इतर (तुलनात्मक गरीब) भिडूंचे ओढलेले. हे साधले नाहीत, तरी भविष्यात फक्त एका हाताची जबाबदारी वाढणार. म्हणजे गर्भश्रीमंती टिकली नाही, तरी भीक मागण्याची पाळी नजीकच्या भविष्यात नसणार हे नक्की.

पाच हात बनवणारा भिडू हा मात्र गरीब बिचारा आहे. दहा पत्त्यांपैकी पाचांपासून हात बनवण्याची जबाबदारी असते बिचाऱ्यावर. शिवाय हुकूमही यानेच बोलायचा. तोही पहिल्या पाच पानांच्या आधारे! पहिल्या पावसावरून शेतीचा अंदाज बांधावा लागतो तसंच सगळं राम भरौसे! शिवाय, कदाचित पूर्वी सावकाराकडून कर्ज घेतलेलं असल्यास पाचांपेक्षा अधिक हात बनवून ते कर्ज फेडणेही आलंच.

तीन हात बनवणारा तसा भाग्यवानच म्हणावा लागेल. याच्या वाट्याला 'पाच'वाल्यासारखं राबणंही नाही आणि 'दोन'वाल्यासारखा 'आराम'ही नाही. तीन हात बनवावे निवांत रहावं. पूर्वी जर गुंतवणूक केलेली असेल (स्वतः 'दोन'वाला असताना) तर त्यातून झालेल्या लाभांचा उपभोगही घेता येतो. हा पत्ते वाटत नाही आणि हुकूमही बोलत नाही. मध्यमवर्गीयाप्रमाणे बहुतांशांना हवीहवीशी वाटणारी जीवनशैली असलेला पण वैयक्तिक 'आवाज' नसलेला.

कालमानापरत्वे परिस्थिती बदलल्यामुळे किंवा अध्यात्मिक विचारप्रणालीनुसार जन्म बदलल्यामुळे आलटून पालटून दोन, तीन आणि पाच हातांच्या जबाबदाऱ्या येतात, त्या जबाबदाऱ्या कधी पार पडतात, तर कधी पार पडल्यामुळे भविष्याबद्दलची चिंता वाढवतात. आणि 'पाच-तीन-दोन'च्या डावांचं हे चक्र अखंड चालू राहतं.

Thursday, May 27, 2010

रेशिमगाठी

दारांमधल्या भिंती आणिक भिंतींमधली दारे
लपंडाव हा सुखदुःखाचा व्यापे जीवन सारे

गावामधले रस्ते आणिक रस्त्यांलागत गावे
कुठवर चालावे थांबावे कधी, कुणाला ठावे?

शब्दांमधले अंतर आणिक अंतरातले शब्द
अवचित येती, मना स्पर्शिती अन् करती निःशब्द

नात्यांमधले प्रेम अलौकिक अन् प्रेमाची नाती
नात्यांच्या गुंत्यात हरवल्या नाजुक रेशिमगाठी

हसावे की रडावे?

आज दै. सकाळच्या ई-पेपरवर एक बातमी वाचली आणि हसावे की रडावे ते कळले नाही. त्या बातमीचं कात्र पहा -आता तरी सरकार जागे होईल का?

सूचना: कात्रण दै. सकाळ (-पेपर) वरून साभार तयार केले.

Friday, April 30, 2010

ग्रीष्मातला पाऊस

निंबवृक्ष दारचे, आज बोलले जणू
तेजसे तुझ्या रवे, माझि त्रासली तनू

वृक्ष मी इथे उभा, देत सावली चरां
उष्णता तुझी मला, सोसवे न भास्करा

तापली वसुंधरा, तापल्या दिशा दहा
तापल्या हवे अता, शीतळून तू वहा

ग्रीष्मकाळप्रकृती, तापवी धरा रवी
आज मात्र वृक्षही, नीरदेव आळवी

हृदय द्रावले तदा, नीरदेव जागले
वाहला समीर अन्, गगनि मेघ दाटले

वीज ती कडाडली, घन क्षणात वर्षले
वृक्ष, वेलि, प्राणि, सर्व, तृप्त तृप्त जाहले

Saturday, March 13, 2010

सौंदर्यामधुन नित्य ती चालते

लॉर्ड बायरन् यांची "शी वॉक्स इन् ब्यूटी" ही कविता इंटरनेटवर मिळाली. आणि स्वैर अनुवाद करण्याची हुक्की पुन्हा आली. यात प्रत्येक ओळीसाठी बाराक्षरी छंद (६+६) वापरला असून शेवटल्या अक्षरांच्या आकार-इकार-उकारांमध्ये मूळ कवितेनुसार (१२१२१२; ३४३४३४; ५६५६५६) यमकांची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे. मूळ कवितेच्या आशयाशी या कवितेचा आशय कितपत जुळतोय हे तुम्हीच ठरवा.

सौंदर्यामधुन नित्य ती चालते,
निरभ्र आकाशी चांदण्यांची रात.
कृष्णधवलांचे लावण्य नांदते,
तिच्या असण्यात, तिच्या नयनांत.
लाभले रात्रीस मंद चांदणे, जे
स्वर्गे नाकारले दिनास प्रदीप्त!

ओज होता न्यून छटा वा अधिक
नासेल क्षणात अमोल रूप, जे
वाहे काळेभोर कुरळ केसांत,
नी तिचा चेहरा मंद तेजाळते.
किती ते लाघवी, निर्मळ, निश्चित!
व्यक्त विचारांचे जणु आगर ते!!

तिच्या गालांवरी नी भुवयांवरी
शांत, हळुवार, तरीही सुस्पष्ट
तेजस्वी कटाक्ष नी हास्य लाघवी
जगले सुखाचे क्षण जे, कथत
सर्वलाभे शांती आत्म्यां लाभलेली
निखळ प्रेमे वा मानस जे व्याप्त.


Saturday, February 27, 2010

तुझे नक्षत्रांचे देणे

शनिवार दि. १३ फ़ेब्रुवारी २०१० रोजी दुपारी ४:०० वाजता घारे सर (गुरुवर्य पं. प्रभाकर परशुराम घारे, सुशील संगीत विद्यालय, घारे गल्ली, छोटी धंतोली, नागपुर) आम्हाला सोडून गेले. मी तेव्हा प्रवासात असल्यामुळे बातमी दोन दिवसांनी कळली. घारे सर आपल्यात नाहीत हे स्वीकारायला अजूनही मन तयार होत नाहीये. त्यांच्याबद्दलच्या भावना शब्दांत मांडणं शक्यच नाही. पण लिहिल्याशिवाय राहावत नाही.....

१९८६ मधली गोष्ट आहे. महिना जुलै की ऑगस्ट ते आठवत नाही, पण शाळा सुरू होऊन थोडेच दिवस झाले होते. संध्याकाळी ५ च्या सुमारास आई मला घारे सरांकडे घेऊन गेली होती. तेव्हा मी सात वर्षांचा होतो. लहानपणी माझा आवाज "गोड" होता असं आमच्याइथे काही लोकांना वाटायचं, म्हणून घारे सरांकडे गायन शिकण्याकरता मला भरती केलं. मला मात्र गाणं शिकणं फारच कंटाळवाणं वाटायचं. कदाचित् गायन शिकायला सगळ्या मुली आणि मी एकटाच मुलगा हेही एक कारण असावं. शिवय, तिथे क्लासमध्ये व्हायोलिन, सतार, तबला अशी वाद्य दिसायची आणि गाण्याच्या विद्यार्थ्यांना सर वाद्यांना हात लावू देत नसतं म्हणून कदाचित् आपण एखादं वाद्यच शिकायला हवं असं तेव्हा वाटायचं. त्यामुळे प्रारंभिक आणि प्रवेशिका प्रथम या परीक्षा झाल्यानंतर गाण्याच्या क्लासला जायचा कंटाळा केला. मग नेमकं काय झालं ते आठवत नाही, पण जवळजवळ वर्षभराच्या गॅपनंतर व्हायोलिन शिकायला पुन्हा घारे सरांकडे जायला सुरुवात झाली.

व्हायोलिनचा क्लास सुरू झाला तो दिवस मी विसरू शकत नाही. तो दिवस होता १ एप्रिल १९८९. वेळ सकाळी ७ वाजता. सरांनी एक व्हायोलिन हातात दिलं. मी ते सारंगीसारखं पकडलं. नंतर त्यांनी व्हायोलिन कसं पकडायचं, बो कसा धरायचा वगैरे सांगितलं, आणि एकेका तारेवर डावीकडून उजवीकडे/उजवीकडून डावीकडे बो सरळ चालवणे आणि टोकाशी आल्यावर तार बदलणे हा पहिला धडा दिला. याची प्रॅक्टिस जवळजवळ आठवडाभर चालली. नंतर सा रे ग म प ध नि सां कसं वाजवायचं ते शिकवलं आणि असं करता करता भूपाली रागापर्यंत प्रगती झाली. मग गायनात शिकलेले काही राग व्हायोलिनवादनाच्या वेळी नव्याने भेटले. आणि हळूहळू व्हायोलिन क्लास आवडू लागला.

क्लासला उन्हाळ्याची महिनाभर सुटी असायची. वर्षभरानंतर सुटी सुरू झाली होती तेव्हा घरी रियाज़ करायला क्लासमधलं व्हायोलिन एक व्हायोलिन घेऊन जा असं महिनाभर आधी सरांनी सुचवलं होतं. शेवटच्या दिवशी तर चक्क नवीन व्हायोलिन सरांनी दिलं, आणि म्हणाले की हेच व्हायोलिन तू विकत घे. पैसे नंतर दिलेस तरी चालेल. माझं स्वतःचं व्हायोलिन मिळालं याचा आनंद ओसंडून वाहत होता. घरी घाईघाईने येऊन आईबाबांना सांगितलं. त्यांनी ताबडतोब पैसे दिले. अजूनही तेच व्हायोलिन आहे माझ्याकडे. तेव्हा फक्त साडेपाचशे रुपये किंमत होती त्याची.

घारे सरांचा स्वभाव हलका फुलका होता. विद्यार्थ्यांची वाजवताना कधी चूक झाली तरी रागवण्याऐवजी "शाबास" असं मिश्किलपणे म्हणायचे. काहीतरी चुकलंय हे आम्हाला लगेच कळायचं. आपल्याला येत नाही असं कोणाला जर फारच वाटलं तर त्याच्यासमोर सर त्यांचे चुना-तंबाखूचे डबे ठेवून बोटाने डबे दाखवत म्हणायचे - "हे (पहिला डबा) असं असतं, म्हणून हे (दुसरा डबा) असं असतं. हे असं नसतं तर हे असं झालं असतं का? मुळीच नाही. (पॉज़ घेऊन) म्हणून हे असंय." विशारद होईपर्यंत शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताव्यतिरिक्त इतर काही वाजवायला सरांनी मनाई केली होती. याला अपवाद फक्त एकच. शाळेमध्ये स्नेहसंमेलन किंवा इतर काही कारणास्तव संगीताचा कार्यक्रम असेल तर तिथे सुगम संगीत वाजवायला फुल परमिशन होती. एकदा शाळेत स्नेहसंमेलनाच्या प्रॅक्टिसच्या वेळी व्हायोलिन ट्यून करण्याचं धाडस केलं होतं आणि दोन तारा तोडल्या होत्या. आता आपलं व्हायोलिन कामातून गेलं असं वाटून तेव्हा खूप भीती + दुःख झालं होतं. शाळेतून घरी न येता थेट क्लासमध्ये गेलो आणि सरांना सगळं सांगितलं. सरांनी मला शांत केलं आणि ताबडतोब त्यांच्याकडच्या दोन तारा लावून दिल्या. दुसऱ्या दिवशी व्हायोलिन कसं लावायचं याचंही ट्रेनिंग मिळालं. गुरू म्हणूनच नव्हे, पण वडिलधारी व्यक्ती म्हणूनही त्यांनी अनेकदा मला मार्गदर्शन केलं, मदत केली आणि सांभाळूनही घेतलं. आरतीताईच्या लग्नासाठी घरी पाहुणे जमले होते तेव्हा गाण्याचा अनौपचारिक कार्यक्रम झाला होता. तेव्हा सुहासदादाचं लग्नही २-३ दिवसांवर आलं होतं. तबलावादनाची सोय होती पण तबला मिळत नव्हता. पण तेव्हासुद्धा क्लासमधला तबला सरांनी दोन दिवसांकरता दिला होता.

संगीत नादमय असलं, तरी त्यातला "शास्त्र" हा भाग तुलनात्मक रटाळ आहे. पण ते शिकवतानाही अशी काही उदाहरणं सर द्यायचे, की हसत खेळत त्याचा अभ्यास व्हायचा. उदा. "लय" हा शब्द ऐकला की "लय पावणे" हा वाक्प्रचार आठवतो आणि हसू येतं. रागांचे गानसमय आणि त्यातल्या बंदिशींवरचं सरांनी सांगितलेलं नेहमी आठवतं. भैरव, विभास, देशकार या रागांमध्ये गायी चरायला जातात अशा आशयाच्या बंदिशी रचल्या जाऊ शकतात. त्याच बंदिशी जर मारवा, पूरियाधनाश्री, भूपाली, यमन मध्ये वापरायच्या असतील, तर चरायला जाण्याऐवजी गायी घरी परतायला हव्या. ललित, शुद्ध सारंग मध्ये "तपन लागी" असे शब्द असणं अगदी स्वाभाविक आहे ही बंदिश फारतर पटदीपमध्ये बसवता येईल, पण बागेश्री, मालकंसमध्ये हे शब्द नाही चालायचे. सोहोनी मधलं "काहे अब तुम आये हो"वर सर म्हणाले, की सोहोनी रागाच्या वेळी कोणीही घरी आलं तरी "काहे अब तुम आये हो?" हाच प्रश्न पडेल. तेव्हा सगळेजण मनसोक्त हसले होते.

सुशील संगीत विद्यालयातला सर्वाधिक लक्ष्यात राहिलेला काळ म्हणजे १९९६-१९९८. या काळात आम्ही १०-१२ विद्यार्थी (व्हायोलिन, गायन, तबला) मध्यमा पूर्ण ते विशारद या वर्षांमधले होतो. त्यावेळी दर महिन्यात किमान एकदा कोणाकडेतरी एकत्र जमायचं आणि १५-२० मिनिटांसाठी एखादा राग प्रस्तुत करायचा असं ठरवलं आणि दीड वर्षांच्या काळात जवळ जवळ २५ वेळा संगीतसभा झाली. प्रत्येक संगीतसभेच्या शेवटी सरांचं व्हायोलिनवादन आणि त्यानंतर अल्पोपहार असा हा उपक्रम होता. या उपक्रमामुळे संगीताबद्दल गोडी वाढलीच, पण कलासादरीकरणातला प्रोफ़ेशनल दृष्टिकोण कळू लागला. या उपक्रमातलाच एक कार्यक्रम कोराडीमध्ये झाला आणि त्यानंतर सुशील संगीत विद्यालयाची कोराडी शाखा सुरू झाली! सर स्वतः बसने कोराडीला जाऊन आठवड्यातून दिवस क्लास घ्यायचे! जवळ जवळ दोन वर्षे कोराडीमध्ये क्लास होत होता, पण जास्त दगदग होऊ लागल्याने हळूहळू बंद केला. नंतर कोराडीचे विद्यार्थी छोट्या धंतोलीत क्लाससाठी येऊ लागले.

सर विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये इतके मग्न असायचे की विद्यार्थ्यांकडून महिन्याची फी घेणे वगैरे कशातच त्यांचं लक्ष्य नसायचं. क्लासमध्ये ते इतका वेळ देऊ शकत होते त्यामागे त्यांचं जेवढं समर्पण होतं, तेवढंच काकूंचं (सौ. सुशीला प्रभाकर घारे). घराची आणि क्लासमधल्या व्यावहारिक गोष्टींची पूर्ण जबाबदारी काकू समर्थपणे चालवत होत्याच, शिवाय खंबीरपणे सरांच्या पाठीशी होत्या. उपांत्यविशारदची परीक्षा होती तेव्हा काकू हॉस्पिटलात होत्या. नंतर सहा-आठ महिने त्या आजारीच होत्या. पण त्या परिस्थितीतही सरांना क्लास सुरू ठेवण्याचा आग्रह करायच्या. अगदी काकूंच्या निधनाच्या दिवशी दुपारपर्यंत क्लास सुरूच होता. काकूंची तब्येत शेवटी शेवटी खूपच नाजुक झाली होती. पण तशाही परिस्थितीत सर आणि खरंतर सर्वच घारे कुटूंबीय हसतमुख होते. याच दिवसांमध्ये इंडियन म्युझिक एज्युकेशन सोसायटीने शास्त्रीय संगीताची स्पर्धा आयोजित केली होती. तिथे सरांच्या सल्ल्यानुसार मी भाग घेतला होता आणि पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्यानंतर क्लासमध्ये आलो होतो तेव्हा काकूंना सलाईन लावलं होतं आणि हालचालही करता येत नव्हती. पण माझं कौतुक त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होतं.
नंतर दोन-तीन दिवसांतच काकू आम्हाला सोडून गेल्या.

काही दिवसांनी क्लास पुन्हा सुरू झाला. आमच्या १०-१२ विद्यार्थ्यांपैकी काहींची विशारदची परीक्षा झाली आणि काहीजण पोटापाण्यासाठी परगावी गेले त्यामुळे मासिक संगीत सभांचा उपक्रम मात्र बंद पडला. १९९९मध्ये मीही उच्च शिक्षणासाठी पुण्याला गेलो. पुण्याला जायला निघालो होतो तेव्हा सरांनी एक-दोन पत्ते दिले होते. "पुण्याला मोठा गुरू मिळेल पण एकदम कोणाकडे जाण्यापूर्वी यांपैकी कोणाकडे तरी विचार. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांचा अभ्यासक्रम इथेही शिकवला जातो, त्यामुळे यांच्याकडून योग्य सल्ला मिळेल असं मला वाटतं." - सर. सरांकडून पत्ते घेतले खरे, पण माझ्याकडून हालचाल व्हायला वेळ लागला. रियाज कमी होत होता. पुढे सरांच्या पंच्याहात्तरी निमित्त नागपूरला कार्यक्रम झाला होता त्यात मला व्हायोलिन वाजवायला संधी मिळाली आणि पुन्हा व्हायोलिनची प्रॅक्टिस जोरदार सुरू झाली. नागपूरहून पुण्याला परतल्यावर मात्र सरांनी दिलेल्या पत्त्यांवर संपर्क करायचाच असा निश्चय केला आणि एक दिवस गोडसे व्हायोलिन विद्यालयात गेलो. तिथल्या सरांनी माझं व्हायोलिन ऐकलं आणि उ. फ़ैयाज़ हुसेन खाँसाहेबांकडे जाण्याचा सल्ला दिला. घारे सरांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांनी अभिनंदन केलं आणि म्हणाले, की गोडसे यांनी योग्य मार्गदर्शन केलंय. पूर्वी पुण्यात कार्यक्रम झाला असताना घारे सरांच्या भाच्याने खाँसाहेबांकडून बो आणून दिला होता हे त्यांनी आवर्जून सांगितलं. उ. फ़ैयाज़ हुसेन खॉंसाहेबांकडे क्लास सुरू होण्यापूर्वी घारे सरांनी मला उपदेश केला होता - प्रशांत, तिथे जाशील तेव्हा ते सांगतील ते नीट ऐकायचं आणि इथे मनापासून शिकायचास तसंच शिकायचं. त्यांनी काही सांगितल्यावर "माझे सर असं म्हणायचे" वगैरे कधीही बोलायचं नाही आणि तसा विचारही करायचा नाही. तरच त्यांची शैली, त्यांचं ज्ञान तुला संपादन करता येईल. घारे सरांच्या या मोलाच्या सल्ल्यामुळे उ. फ़ैयाज़ हुसेन खॉंसाहेबांसारखे जेष्ठ कलाकार मला गुरू म्हणून लाभले.

मी पुण्याला असताना एक-दोनदा घारेसर माझ्याकडे आले होते. घारे सर पहिल्यांदा आले होते तेव्हा सर (खॉंसाहेब) मुंबईला गेले असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. पण पुढल्या खेपेत दोन गुरूंची भेट घडवू शकलो याचं समाधान आहे. २००७ मध्ये खॉंसाहेबांना महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार जाहीर झाला होता. पुरस्कार वितरण सोहळा नागपूरमध्ये वसंतराव देशपांडे सभागृहात झाला होता तेव्हा पुन्हा खॉंसाहेबांची आणि घारे सरांची भेट झाली. मी अमेरिकेला जाण्यानिमित्त व्हिसाच्या गडबडीत असल्यामुळे नागपूरला जाऊ शकलो नव्हतो. नागपूरच्या भेटीच्यावेळी घारे सरांची तब्येत खूपच खालावली होती. दम्याच्या त्रासामुळे ते हॉस्पिटलमध्येच होते. खॉंसाहेब (सर) अजूनही त्या भेटीबद्दल अधुनमधून सांगत असतात. घारे सर आणि खॉंसाहेब उ. फ़ैयाज़ हुसेन खाँ हे दोन्ही कलाकार मला गुरू म्हणून लाभले हे माझं भाग्य आहे.

घारे सरांच्या इतक्या आठवणी आहेत, की शब्द अपुरे पडतील. त्यांची उणीव तर सदैव जाणवत राहील. सर प्रत्येक परिस्थितीत हसतमुख राहिले आणि मृत्यूलाही हसत हसत सामोरे गेले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

२१ डिसेंबर २००८ रोजी घारे सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांचं व्हायोलिनवादन रेकॉर्ड करून त्यांच्या परवानगीने यु-ट्यूबवर उपलब्ध केलं होतं.
८३ वर्षांच्या सरांनी तेव्हा २-३ मिनिटांसाठी एक-एक राग या प्रमाणे तीन रागांची झलक प्रस्तुत केली होती. रसिकांसाठी त्या क्लिप्स इथे देत आहे.

१. राग मारुबिहाग

२. राग शिवरंजनी

३. राग बिलासखानी तोडी






तबला साथ - श्री. सुहास घारे
व्हायोलिन साथ - प्रशांत मनोहर

रेकॉर्डिंग - कु. श्रेया सुहास घारे

Saturday, January 30, 2010

मांडवपरतणी

नव्या गावी जाणे आले
चालणे शोधीत वाट
मागे वळून पाहता
दिसे धुके घनदाट

नव्या गावामध्ये माझ्या
सारेच दिसे नवीन
पोचताच दिमाखात
स्वागत करती जन

सरबराई होतसे
प्रेमाने भरभरून
जुन्या आठवांत पण
आज हरवले मन

फिरूनिया एकदाच
मन जाई जुन्या गावा
सग्यासोयर्‍यां भेटून
क्षणभर घे विसावा

घेई गगनभरारी
विसावून क्षणभर
नवे गाव वाटू लागे
प्रेममायेचे आगर

जुने वाटे दूर आता
वाटे हेच माझे घर
नवीन गावच माझी
स्वप्ने आता साकारेल